मंदिरचे विषयी

।। श्री गजानन महाराज प्रसन्न ।।
 
।। गणगण गणात बोते ।।

मंदिर निर्माण कार्याबद्दल

पुणे शहरात काही वर्षापूर्वी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज (शेगांव) यांची पालखी कार्तिकी आळंदी वारीसाठी दरवर्षी ३ दिवस शनिवार पेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेच्या विस्तीर्ण मैदानात मुक्कामी येत असे. या सोहळ्यास भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असे. या पालखीच्या सोहळ्यानिमित्ताने पुण्यनगरीतील काही भक्तांनी दि. २६.१०.१९८८ रोजी श्री गजानन महाराज (शेगांव) सेवा प्रतिष्ठान स्थापन करून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुण्यनगरीत श्री गजानन महाराजांचा भव्य मंदिराचा दृढ संकल्प करून परमश्रध्देने वाटचाल सुरू केली.

प्रतिष्ठानच्या भक्त परिवारातील मंडळींनी श्रींच्या प्रचार व प्रसाराबरोबर मंदिराच्या निधी संकलनासाठी श्री गजानन महाराजांची उपासना सुरू केली. शनिवार पेठेतील श्री. विजयराव पावशे यांच्या घरासमोरील श्री जोशी श्रीराम मंदिरात साधारणतः १५ पुरुष व १२ महिला यांनी नियमितपणे उपासना सुरु केली. त्याचबरोबर उपासनेमध्ये दर गुरुवारी श्री गजानन विजय ग्रंथातील एका अध्यायाचे वाचन, दुर्वांकुर, अष्टक वाचन तसेच नामजप व आरती करण्यात येत असे. तसेच नाशिकच्या ज्येष्ठ साधक सुमतीताई बापट यांना मुखोद्‌गत असलेल्या श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण सोहळा आपटे रोडवरील श्रुती मंगल कार्यालय व श्री. झांझले यांच्या सौभाग्य मंगल कार्यालयात करण्यात आला, प्रकट दिनाचा एक उत्सव शनिवार पेठेतील श्री. सुरेश तांबेकाका यांच्या जागेत तर काही उत्सव नारायण पेठेतील श्री. वसंत पळशीकरांच्या हरीनिवास कार्यालयात साजरे झाले.

संकल्प केल्याप्रमाणे या मठाच्या उभारणीस योग्य जागा मिळविण्यासाठी सर्वश्री स्व. विजयराव पावशे, स्व. वसंतराव लिमये, स्व. आनंदराव मेमाणे व स्व. बाळासाहेब कुलकर्णी यांनी वसंतराव लिमयेंच्या एका स्नेहींच्या माध्यमातून पर्वती येथील लक्ष्मीनगर भागातील त्यावेळचे तत्कालीन लोकप्रिय नगरसेवक मा. स्व. श्री. भारत पवार उर्फ भाऊ यांची भेट घेतली व त्यांच्याशी या मंदिराच्या उभारणीची सविस्तर चर्चा करून मंदिरास या भागात जागा उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. त्यावेळेस स्व. भारत पवार यांनी पुण्यनगरीचे भूषण असणाऱ्या पर्वतीच्या अनेक प्राचीन देवालये व धार्मिक व अध्यामिक वातावरण असलेल्या लक्ष्मीनगर परिसरातील अत्यंत मोक्याची, ओढ्यातील धोबीघाटाची मोकळी जागा दाखविली. ही जागा सर्वांना पसंत पडली व त्यानंतर स्व. भारत पवार यांच्या माध्यमातून सरकार दरबारी, पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन यांच्याकडे जागा मिळविण्यासाठी विनंती अर्ज दाखल केले. श्री. गजानन महाराजांची पालखी पुण्यात आली असताना या प्रयत्नास यश येऊन सोनियाचा योग जुळून आला व श्रींच्या मंदिरासाठी सदरची जागा देत असल्याचे पुणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. श्रीनिवास पाटील यांचे सहीचे दि. ८.११.१९९० चे पत्र मिळाले व अत्यंत मोक्याची ही जागा उपलब्ध झाली. हा महाराजांचा कृपाशीर्वादच लाभला या भावनेने सर्वांचा उत्साह वाढला.

स्व. भारत पवार स्वतः धार्मिक वृत्तीचे असल्याने त्यांनी या श्रींच्या मंदिराच्या उभारणीची जबाबदारी आत्मियतेने स्विकारली. प्रतिष्ठानमधील सर्व सेवेकऱ्यांनी पुढील रूपरेषा ठरविली व सतत स्व. भारत पवार यांच्या संपर्कात राहून पुढीला नियोजन सुरु केले. सदर जागेसाठी सरकारने जागेची किंमत म्हणून काही रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्यास कळविले होते. सदर निधी उभारणीस महाराजांचे भक्त स्व. श्री. दत्तात्रय लगड, श्री. प्रकाश आंब्रे, स्व.श्री. वसंतराव लिमये यांनी वैयक्तिक कर्ज घेऊन निधीची पूर्तता केली.

सदर उपलब्ध जागेवर काही लोकांचा वावर व वास्तव्य होते. त्यांचे स्थलांतर योग्य ठिकाणी करुन स्व, भारत पवार यांनी कुशलतेने जागा रिकामी करुन घेतली. श्री गजानन महाराजांच्या पादुकांची स्थापना करण्यासाठी एक छोटीशी कुटी (झोपडी) बांधण्यात आली. प्रत्यक्षात या कुटीच्या बांधकामासाठी लागणारा सर्व खर्च प्रतिष्ठानचे खजिनदार सेवेकरी श्री. विजयराव पावशे काकांचे परममित्र शनिवार पेठेतील जोशी श्रीराम मंदिराच्या शेजारी राहणारे श्री. श्रीकांत परांजपे काका यांनी केला व सुंदर छोटीशी कुटी तयार झाली. सदर कुटीचे पुढे दि. ४ मार्च २०१३ रोजी नुतनीकरण करण्यात आले.

या कुटीमध्ये स्थापना करण्यासाठी सुप्रसिद्ध चित्रकार श्री. रघुनाथ भरम यांचेकडून श्री गजानन महाराजांचे एक सुंदर चित्र तयार करुन घेतले. चित्र तयार करण्यासाठी त्यांनी केवळ नाममात्र मानधन घेऊन सेवाभावनेने चित्र पूर्ण करुन दिले. या प्रतिमेची स्थापना पालखीतून मिरवणूक काढून वाजत गाजत अत्यंत उत्साहाने शुभदिन विजयादशमी दि.१२ ऑक्टोंबर १९८७ रोजी करण्यात आली.

या जागेत दोन खोल्यांच्या मंदिरात महाराजांची तसबीर ठेवून कामांची सुरुवात झाली. गुरुवारी तर दिवसभर भक्तांची गर्दी असे. भक्त मंडळी पोथी वाचन, उपासना जप करीत असत. दिवसेंदिवस भक्तांची बऱ्यापैकी गर्दी वाढू लागली. देणग्यांचा ओघही सुरु झाला.

सेवा प्रतिष्ठानच्या सर्व सेवेकऱ्यांची १९९४ साली मुख्य भव्य मंदिराच्या बांधकामाची मुहूर्तमेढ केली. त्यानुसार मंदीर कसे असेल याची भक्तांना कल्पना यावी बासाठी मंदिराची एक हुबेहूब छोटी प्रतिकृती (मॉडेल) सुप्रसिद्ध आर्कटिक्ट श्री. एस. ए. बक्षी यांनी तयार केली व ते भक्तांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले. मंदिर उभारण्याचा श्रीगणेशा झाला. या कामाचा शुभारंभ दि. २८ मार्च १९९८ रोजी पुण्यातील पर्वती सहकारनगर भागातील एक महान नाथपंथीय संतवर्य योगीराज श्री शंकर महाराज यांचे शिष्य योगी गुरुवर्य श्री ज्ञाननाथजी रानडे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करुन पार पडले. या कार्यक्रमास संत साहित्याचे व लोकवङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक श्री. रामचंद्र देखणे व सेवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, भक्त परिवार आदि मंडळी उपस्थित होती. भूमिपूजनाच्या कार्यक्रमात श्री. ज्ञाननाथजी रानडे यांनी ज्या जागेवरती मठाची उभारणी होत आहे, त्या जागेवर पूर्वी सद्गुरु श्री शंकर महाराज आता असलेल्या धनकवडी येथील शंकर महाराज मठाच्या जागी जात असताना अनेकदा बसत असत. याविषयी उपस्थितांना विस्तृत माहिती दिली.

सदर मंदिरात तळमजल्यावरील प्रशस्त दालनात समोरच थोर साई भक्त श्रीमान विजय हरी वाडेकर यांनी महाराजांच्या चरणी अर्पण केलेल्या लाकडी पलंग व गादीवर सद्गुरु श्री गजानन महाराजांची प्रतिमा मोठ्या तसबिरीच्या रुपात स्थापन झाली. आज महाराजांची जी पालखी आहे ती सुध्दा श्री. विजय हरी वाडेकर यांनीच महाराजांच्या चरणी अर्पण केली आहे. मंदिराच्या वरील मजल्यावर श्रींच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेसाठी विशाल चौथरा तयार करण्यात आला. या चौथऱ्याचे रविवार दि. ५ जानेवारी २००३ रोजी पिंडीका पूजन करण्यात आले. मंदिरातील श्रींच्या मूर्तीसाठी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी जयपूर येथे भेट देऊन एक अत्यंत विलोभनीय व अभय मुद्रेतील सुंदर अशी मूर्ती अखंड संगमरवर दगडात घडवून घेतली. या श्रींच्या मूर्तीची दि. ९.१.२००३ रोजी सारसबागेपासून भव्य शोभायात्रा काढून अत्यंत उत्साहात व वाजतगाजत मूर्ती मठामध्ये आणण्यात आली. या श्रींच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचे सर्व धार्मिक कार्यक्रम सोमवार दि. १०.१.२००३ ते बुधवार दि. १५.१.२००३ या काळात विष्णूयाग, गणेशयाग इ. सर्व भक्तांच्या अतिशय उत्साहपूर्वक व भक्तीमय वातावरणात संपन्न झाले व गुरुवार दि. १६ जानेवारी २००३ रोजी शुभ मुहूर्तावर एका वैभवशाली व देखण्या समारंभात विधीपूर्वक थाटामाटाने श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पुण्यनगरीच्या अध्यात्मिक वैभवात भर घालणारे अतिशय सुंदर भव्य श्री गजानन महाराज यांचे मंदिर साकार झाले.

मंदिराच्या या सुवर्ण कलशाचा अनावरण सोहळा श्रृतीसागर आश्रम फुलगावचे आदरणीय स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

निधी संकलनाच्या कार्यात स्व.श्री. भारत पवार, स्व.श्री. विजय पावशे, स्व.श्री. वसंतराव लिमये, स्व. अनिलभाऊ जाधव, स्व. मधुकर कुलकर्णी, वसुधाताई वर्तक, मुळे काकू, गजेंद्रगडकर काकू, दातेमामा, बुरसेकाका, स्व. दत्तात्रय लगड, श्री. प्रकाश आम्रे, समकालीन विश्वस्त त्याचबरोबर असंख्य ज्ञात व अज्ञात भक्तगणांनी अत्यंत मनापासून निष्ठेने व वेळोवेळी निरपेक्ष भावनेने केलेले सहकार्य समर्पण यातून अनेक वर्षापासूनचा संकल्प व स्वप्न प्रत्यक्षात साक्षात् सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाने साकार झाले. कालांतराने भाविकांचा वाढता ओघ लक्षात घेवून मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी अनेक अद्ययावत बदल करण्यात आले.

खुला रंगमंच, देणगी कक्ष, वैद्यकीय सेवा कक्ष, चप्पल स्टॅन्ड, स्वच्छतागृह, विस्तीर्ण सुशोभित सुसज्ज प्रांगण, प्रसादगृह, तीन मजली प्रशासकीय कार्यालय इमारत, भांडारगृह, विश्वस्तांचे कार्यालय, देणगी, धार्मिक कार्यक्रमांसाठी छोटे सभागृह, ध्यानमंदिर, अतिशय सुंदर श्रीराम मंदिर, बैठक हॉल अशी अनेक कामे प्रतिष्ठानच्यावतीने सेवेकरी श्री. नरेंद्र बाकले यांच्यामार्फत करण्यात आली.